मळणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
((मळणी) या पानावरून पुनर्निर्देशित)

मळणी हे धान्य तयार झाल्यानंतर ते पिकापासून वेगळे करण्यासाठी करावयाची एक प्रक्रिया आहे. शेतात धान्य तयार झाले की धान्याच्या कणसांपासून धान्य सुटे केले जाते. धान्य तयार झाले की शेतात एका सपाट जागी खळे तयार केले जाते.ही सपाट जागा स्वच्छ आणि चोपणीने सपाट केली जाते. ही साधारणपणे गोल असते आणि पंधरा ते वीस फूट व्यासाची असते. ह्या जागेच्या मधोमध एक भक्कम लाकडाचा खांब रोवला जातो. खळ्याची संपूर्ण जागा गाईच्या शेणाने सारवली जाते.धान्याचे पीक खांबाभोवती पसरवले जाते आणि मधोमध असलेल्या खांबाला बैल किंवा टोणगा बांधून त्या बैलाला गोल गोल फिरवत असत. बैलाच्या पायाखाली धान्याची कणसे येऊन धान्य आणि पेंढा वेगवेगळा होत असे. नंतर धान्य सुपात किंवा अन्य भांड्यात धरून उंचावरून वाऱ्याच्या दिशेनुसार खाली सोडले जाई जेणेकरून धान्याचे दाणे एका ठिकाणी एकत्र पडत आणि कचरा किंवा फोलपट भाग उडून दुसरीकडे पडत असे. पूर्वी शेतकरी दिवसभर शेतातील कापणी करून रात्री खळे बनवत असत. रात्री कंदील किंवा पेट्रोमँक्स लावून मळणी चे काम केले जाई.आजुबाजुला असलेले शेतकरीसुद्धा एकमेकांना साथ देत असत.रात्री उशिरापर्यंत मळणी झाल्यानंतर एकत्र जेवण करीत असत. कणसांपासून दाणा काढण्यात येणाऱ्या ह्या प्रक्रियेला मळणी म्हणत असत.जसजसे यंत्र फायदेशीर ठरायला लागले तसतसे शेती ही शेतकरी व बैल ह्यांच्या एकत्रित श्रमापासून दूर गेली आणि खळ्याची परंपरा हळूहळू लोप पावत गेली. खळे ह्या शब्दाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. आकाशात ढग आल्यावर चंद्राभोवती जी गोल आभा दिसते त्यालाही खळे म्हटले जाते.खळे शब्दात लोकसंस्कृती दडलेली आहे आणि त्यामुळे त्या शब्दात विशिष्ट भावना दडलेल्या आहेत त्या शेती जाणकारांनाच समजतात.[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक ११ मे २०२४.